आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने
प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाप्रमाणेच आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे दृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य साधनेही महत्त्वाची ठरतात.
भौतिक साधने
विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके यांचा भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.
- इमारती व वास्तू: ब्रिटिश सत्ताधीश व संस्थानिकांच्या काळातील प्रशासकीय कचेऱ्या, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे, किल्ले, तुरुंग, राजवाडे.
- अंदमान येथील सेल्युलर जेल: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याची माहिती मिळते.
- मुंबईतील मणिभवन व वर्धा येथील सेवाग्राम आश्रम: गांधीयुगाच्या इतिहासाची माहिती मिळते.
- वस्तुसंग्रहालये: पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील वस्तू व कागदपत्रे जतन केलेली आहेत.
- पुतळे व स्मारके: पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म-मृत्यूची नोंद आणि कार्याची माहिती असते (उदा. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व हुतात्मा स्मारके).
