१८५७ पूर्वीचे लढे
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात या लढ्याची मांडणी केली. १८५७ पूर्वीही अनेक लढे झाले:
- बंगाल: संन्याशांचे व फकिरांचे लढे (१७६३–१८५७).
- पाइकांचा उठाव (१८१७): ओडिशातील खडे सैनिक ‘पाइक’ यांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्याने बक्षी जगनबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र उठाव झाला.
- उमाजी नाईक: रामोशी बांधवांना संघटित करून पुणे-सातारा-सोलापूर भागात बंड केले; १८३२ मध्ये पुण्यात त्यांना फाशी देण्यात आले.
- आदिवासी व स्थानिक लढे: कोलाम, गोंड, संथाळ, भिल्ल, कोळी, कोल्हापूरचे गडकरी, कोकणातील फोंड-सावंत; तसेच १८०६ वेल्लोर व १८२४ बराकपूर येथील सैनिकांचे उठाव.
१८५७ च्या लढ्याची कारणे
- आर्थिक कारणे: जबरदस्त शेतसारा, शेतीव्यवस्था कोलमडली, देशी हस्तकला व कापड उद्योगावर जाचक कर.
- सामाजिक कारणे: सतीबंदी व विधवाविवाह कायद्यांमुळे आपल्या परंपरांत हस्तक्षेप होत असल्याची भावना.
- राजकीय कारणे: लॉर्ड डलहौसीने गैरकारभारावरून अयोध्या तर दत्तकविधान नामंजूर करून सातारा, नागपूर, झाशी खालसा केले.
- हिंदी सैनिकांतील असंतोष: दुजाभाव, कमी वेतन/भत्ते, सुभेदारापेक्षा वरचे पद नाही.
- तात्कालिक कारण (१८५६): एन्फिल्ड बंदुकांच्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे, ज्याला गाईची व डुकराची चरबी लावल्याची बातमी पसरल्याने हिंदू-मुस्लीम सैनिक संतापले.
